जळगाव : जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. यानंतर काहीच दिवसांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे. सहा ते सात तोळे सोने व 35 हजाराची रोकड लंपास करण्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने त्यांचा जळगावातील बंगला बंद होता. सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्याने नियमितपणे बंगल्याची पाहणी करण्यासाठी तेथे गेल्यावर घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर कर्मचाऱ्याने तत्काळ खडसे यांना माहिती दिली. खडसे यांनी लगेचच पोलिसांना घटनेची खबर दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
एकनाथ खडसे म्हणाले की, रात्री घरफोडी झालेली आहे. बंगल्यातील सर्व रूमचे कुलुपं तोडून चोरी केलेली आहे. काही सामानाची चोरी झाली आहे. माझ्या रूममध्ये 35 हजार रुपये होते. पाच-पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या होत्या. त्या चोरीला गेलेल्या आहे. खाली आमचे नातेवाईक राहत होते. त्यांचे पाच तोळे सोने चोरीला गेलेले आहे. घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन चोरी केल्याचे दिसून येते. पोलिसांचा जळगाव जिल्ह्यात धाक उरलेला नाही. चोऱ्या, दरोडा, असे प्रकार सातत्याने होत आहेत. दोन नंबरचे धंदे वाढलेले आहेत. पोलिसांवर काही टीका केली तर तिथले स्थानिक मंत्री माझ्यावरच टिंगल करतात. काहीतरी वेगळाच अर्थ करतात. घटनेचे गांभीर्य पोलिसांना आणि सरकारला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
याआधी रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा
दरम्यान, 9 ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताईनगर व वरणगाव परिसरातील तीन पेट्रोल पंपांवर सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते. यामध्ये मुक्ताईनगर येथील रक्षा फ्युअल (केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंप), कर्की फाटा येथील ङ्गमनुभाई आशीर्वादफ आणि तळवेल फाटा येथील ङ्गसय्यद पेट्रोल पंपफ या ठिकाणांचा समावेश होता. त्या रात्री बंदुकीचा धाक दाखवत आरोपींनी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर मिळून सुमारे 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष तपास पथक स्थापन केले होते. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी नाशिक व अकोला जिल्ह्यात छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षल बावस्कर, देवेंद्र बावस्कर, प्रदुम्न विरघट आणि एका विधी संघर्षित बालकाला अटक केली होती.